सोमवार, १० जुलै, २०२३



 ******** कातरवेळ ********

कातरवेळ म्हणजे उतरत आलेली संध्याकाळ , घरी परतत असलेले पक्षी. या वेळी काहीसं एकटं वाटत असतं. ही फक्त कविकल्पना नाही , मी ही कातरवेळ अनुभवली आहे. मनाला उगीचच रुखरुख लागते. मी आज सकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा असंच काहीसं जाणवलं. नवरा त्याच्या कामाच्या फोनवर गुंतला होता. मुलगी दूध पित कार्टून बघत होती. आणि मी भाजी फोडणीला टाकून भाकरीसाठी पीठ मळत स्वतःमध्येच हरवले होते. मग मोबाईलवर जुनी भावगीतं लावली. अनुरागाचे थेंब झेलती, डोळे कशासाठी , शुक्रतारा मंदवारा , तुझ्यात जीव गुंतला वगैरे गाणी ऐकली. हळूहळू मन भूतकाळात गेलं.
२००७ ला नोकरीसाठी नवीनच पुण्यात आले होते. सुटी मिळाली की लगेच सांगलीला घरी जाऊन यायचे. असंच एकदा पुण्यात येत असताना बस पेट्रोल पंपावर थांबली असता माझं मन कातर झालं. घरची आठवण येत होती. जुन्या मैत्रिणींबरोबर घालवलेले क्षण आठवत होते. मोबाईलवर FM लावून गाणी ऐकू लागले. पावसाळ्याचे दिवस असल्याने सातारा आकाशवाणीवर पावसाची गाणी लागली होती. अशातच साताऱ्यात राहणा-या खूप जवळच्या मैत्रिणीची आठवण आली. नकळत डोळे पाणावले.
रेडिओचे गाणे संपली. पुढील गाण्याची उदघोषणा होत असताना वाटलं 'अनुरागाचे थेंब झेलती ' गाणं लागलं तर किती बरं होईल आणि चमत्कार....खरंच ते गाणं लागलं. क्षणात मनाची उदासी उडून गेली. पाऊसाची रिमझिम, आजूबाजूची हिरवळ मन सुखावून गेले आणि चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं.
********************************************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा