सोमवार, १० जुलै, २०२३




 * मैत्री *

काल मी एक प्रश्न विचारला होता " मैत्रीत काळाप्रमाणे बदल होतो की ती कायम तशीच राहते ? " . याचं उत्तर " हो " असं आहे. मुलींच्या बाबतीत हे विशेष करून घडतं. अलिकडे मी माहेरी गेले असताना माझी काही जुनी पुस्तकं , मैत्रिणींनी वाढदिवसाला पाठवलेली शुभेच्छापत्रं, पत्रं सापडली. ती वाचत वाचत मी जुन्या आठवणीत हरवून गेले.
शाळा काॅलेजच्या दिवसात मित्र मैत्रिणी हे आपलं दुसरं जग असतं. अभ्यास, खेळ या सोबतच आपली अनेक गुपितं माहित असलेली हक्काची व्यक्ती म्हणजे मैत्रिणी. माझ्याही खूप मैत्रिणी आहेत. त्यातील काही खूप जवळच्या. आता असंच म्हणावं लागेल की आमच्या वेळी मोबाईल मेसेज इंटरनेट हे नव्हतं त्यामुळे शुभेच्छा , मनातलं बोलायला Greeting cards, पत्रं यांचा आधार असायचा. Slam book ही तेव्हाची trending गोष्ट होती.
मी आणि माझ्या मैत्रिणी एकमेकींना खूप पत्रं लिहायचो. ती पत्र वाचताना वाटतं आज सामान्य वाटणा-या पत्रातील गोष्टी त्यावेळेस किती महत्त्वाच्या होत्या. आयुष्यभर मैत्री जपायचं ठरवून लग्नानंतर आपण संसारात रमतो आणि मैत्री विसरून जातो . ती पत्रं वाचून मी माझ्या जुन्या मैत्रिणींना नव्याने संपर्क करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. पण खरं सांगायचं तर मला तितका प्रतिसाद मिळाला नाही जितका मला अपेक्षित होता. मला वाटतं आपल्या त्यावेळच्या भावना , ती commitment , मनाची ओढ ही काळाप्रमाणे बदलते. लग्नाआधी मैत्रिणींबरोबर घालवलेल्या क्षणांना आठवणं हेसुद्धा काही जणींना आवडत नाही. बहुतेक ते सगळं म्हणजे तरूण वयातला बालिशपणा वाटत असेल. मुलांची मैत्री मात्र आयुष्यभर तशीच रहात असावी. खरंखोटं काही असलं तरी मी मैत्रिणींच्या बाबतीत हळवी आहे. मी त्या सगळ्या आठवणी मी मनापासून जपल्या आहेत आणि अजूनही मी त्यात रमते.



 माझा वाढदिवस आणि माधुरी दीक्षितचं पोस्टर.

मी तेव्हा कॉम्प्युटर क्लबमध्ये computer teacher होते. विद्यार्थ्यी आणि आमच्यात मैत्रीचं वातावरण होतं कारण आम्ही समवयस्क होतो. ब-याच जणांना माझं माधुरीप्रेम माहित होतं. अशातच माझ्या वाढदिवसाला एक सुनील नावाच्या विद्यार्थ्याने एक गुलाब आणि कागदाची गुंडाळी मला दिली. गुंडाळी उघडली तर सेम फोटोचं पोस्टर. मी तर खुर्चीवरून पडायची बाकी होते. इतका आनंद झाला काय सांगू.आजही ते पोस्टर घरातल्या भिंतीवर आहे. समोरच्या आरश्यात प्रतिबिंब पाहून वाटायचं माधुरी आपल्याकडे बघून हसतेय. आज तिच्या वाढदिवसानिमित्त ही आठवण सांगाविशी वाटली. Happy Birthday माधुरी. तू असंच चाहत्यांच्या मनावर राज्य करत रहा.



 ******** कातरवेळ ********

कातरवेळ म्हणजे उतरत आलेली संध्याकाळ , घरी परतत असलेले पक्षी. या वेळी काहीसं एकटं वाटत असतं. ही फक्त कविकल्पना नाही , मी ही कातरवेळ अनुभवली आहे. मनाला उगीचच रुखरुख लागते. मी आज सकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा असंच काहीसं जाणवलं. नवरा त्याच्या कामाच्या फोनवर गुंतला होता. मुलगी दूध पित कार्टून बघत होती. आणि मी भाजी फोडणीला टाकून भाकरीसाठी पीठ मळत स्वतःमध्येच हरवले होते. मग मोबाईलवर जुनी भावगीतं लावली. अनुरागाचे थेंब झेलती, डोळे कशासाठी , शुक्रतारा मंदवारा , तुझ्यात जीव गुंतला वगैरे गाणी ऐकली. हळूहळू मन भूतकाळात गेलं.
२००७ ला नोकरीसाठी नवीनच पुण्यात आले होते. सुटी मिळाली की लगेच सांगलीला घरी जाऊन यायचे. असंच एकदा पुण्यात येत असताना बस पेट्रोल पंपावर थांबली असता माझं मन कातर झालं. घरची आठवण येत होती. जुन्या मैत्रिणींबरोबर घालवलेले क्षण आठवत होते. मोबाईलवर FM लावून गाणी ऐकू लागले. पावसाळ्याचे दिवस असल्याने सातारा आकाशवाणीवर पावसाची गाणी लागली होती. अशातच साताऱ्यात राहणा-या खूप जवळच्या मैत्रिणीची आठवण आली. नकळत डोळे पाणावले.
रेडिओचे गाणे संपली. पुढील गाण्याची उदघोषणा होत असताना वाटलं 'अनुरागाचे थेंब झेलती ' गाणं लागलं तर किती बरं होईल आणि चमत्कार....खरंच ते गाणं लागलं. क्षणात मनाची उदासी उडून गेली. पाऊसाची रिमझिम, आजूबाजूची हिरवळ मन सुखावून गेले आणि चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं.
********************************************************************************************************




आताच जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाची बातमी वाचली. फार दुःख झालं. चित्रपटसृष्टीतील सुरूवातीच्या काळातील एक एक दुवे निखळत आहेत. मला दीदींचे मोलकरीण, एकटी , व-हाडी आणि वाजंत्री , साधी माणसं , ही वाट पंढरीची हे चित्रपट फार आवडले. मराठा तितुका मेळवावा मधील त्यांची करारी , स्वराज्याचं स्वप्न पाहात शिवबाला घडवणा-या तेजस्वी जिजाबाई ही भूमिका तर अजरामर आहे. हिंदीत आईच्या भूमिकेत दिसणा-या दीदी खरं तर कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा " हा पुस्तकातून जास्त जवळून समजल्या. खडकलाट या गावातून कोल्हापूर मध्ये चित्रपट अभिनेत्री होण्यासाठी घेतलेले कष्ट ते भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनखाली तयार होऊन एक यशस्वी अभिनेत्री होण्याचा प्रवास , पतीच्या निधनानंतर कांचन या मुलीसोबत कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी एकटीने सांभाळणा-या , मुलांचे शिक्षण , चांगले राहणीमान मिळण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणा-या , खूप प्रेमळ पण प्रसंगी कठोर बनणा-या , निवृत्तीनंतर

चित्रपटाच्या झगमगाटापासून दूर राहून आपले आयुष्य शांतपणे व्यतीत करणा-या सुलोचनादीदींचे कलाकार म्हणून स्थान कायम वरचे राहिल. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला भावपूर्ण निरोप. 🙏🏻


 Father's Day 


 " चिमण्यांसारख्या नाचतात दहा बारा वर्षं ओसरीवर आणि भुर्रकन उडून जातात हो !" आज चितळे मास्तरांचं हे वाक्य राहूनराहून आठवत आहे. मला लहानाची मोठी करून पाठवणीच्या वेळी रडणारे बाबा. लहानपणी बाबा सुपरमॅन वाटायचे. आहेतच ते आमच्यासाठी.त्यांना दूध तापवण्यापासून ते स्वयंपाक, केरवारा ही सगळी कामं येतात याचा मला अभिमान वाटायचा लहानपणी. दडपे पोहे , पुरी भाजी त्यांच्या हातचे कितीवेळा खाल्ले. खूप लाड केले बाबांनी.

तुम्हाला father's day च्या खूप खूप शुभेच्छा बाबा . 😘😍😇🤗



 


" पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय "

🙏🏻
आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईचे दर्शन घ्यायला मी व बहिण गेलो होतो. गर्दी होईल म्हणून पहाटे चारलाच मंदिरात पोचलो. मंदिर सुरेख सजवले होते. आत चौघडा वाजत होता. दर्शनाची रांग पुढे सरकत होती. एक काका खड्या आवाजात " जय जय राम कृष्ण हरी " चा गजर करू लागले. मग आम्हीही त्यांना साथ दिली. खूप भक्तिमय वातावरण होतं. मंदिरात गेल्यावर विठोबा रखुमाईला फुले वाहून नमस्कार केला. डोळे भरून दर्शन घेतलं. प्रसन्न वाटलं.
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻🌺









मंगळवार, १४ मार्च, २०१७

** **







** शबाना आझमी **


सिनेमा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.रोजच्या धावपळीत मनोरंजनाचे हलकेफुलके क्षण या सिनेमामुळे आपण अनुभवतो. प्रेमकथा , हिरो हिराॅईन , व्हिलन , काॅमेडियन वगैरे आणि ठासून भरलेला मसाला आणि गोड शेवट असा सिनेमा लोकांना आवडतो. हिराॅईन म्हणजे सौंदर्याची खाण अशी आपली समजूत असते. सौंदर्य कुणाला आवडत नाही? माझी पण अशीच समजूत होती. मला सुद्धा सुंदर हिराॅईन आवडतात.
पण पुढे मी प्रादेशिक सिनेमा पहायला लागले. दूरदर्शनवर असे सिनेमे नेहमी दाखवतात. अशातच एकदा श्याम बेनेगलांचा "अंकुर" लागला होता.विषय तसा गंभीर होता. त्यात शबाना आझमी हिराॅईन होती. मला वाटलं काहीतरी रटाळ असणार कारण शबाना आझमी मला मुळीच आवडायची नाही. रूढार्थाने ती सुंदर नाही.पण अंकुर पाहिला आणि सिनेमा पाहण्याची माझी दृष्टीच बदलली. जे काही पाहिलं ते कमाल वाटलं. सौंदर्यापलीकडेही अभिनय ही गोष्ट असते हे मला समजलं.
मग काय? मंडी , साज, अर्थ , पेस्तनजी, मासूम धारावी, दिशा,जज्बा, चाॅक अॅन्ड डस्टर , अनोखा बंधन , अवतार असे सगळे सिनेमे मी पाहिले. मग ती माझी सर्वात आवडती हिराॅईन झाली. तिचे बोलके डोळे ही जमेची बाजू आहे. डोळ्यातील भाव ती इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त करते की काळजाचा ठोका चुकतो.

तर अंकुर चित्रपटाची कथा पुढच्या ब्लॉगमध्ये.