सोमवार, १० जुलै, २०२३




 * मैत्री *

काल मी एक प्रश्न विचारला होता " मैत्रीत काळाप्रमाणे बदल होतो की ती कायम तशीच राहते ? " . याचं उत्तर " हो " असं आहे. मुलींच्या बाबतीत हे विशेष करून घडतं. अलिकडे मी माहेरी गेले असताना माझी काही जुनी पुस्तकं , मैत्रिणींनी वाढदिवसाला पाठवलेली शुभेच्छापत्रं, पत्रं सापडली. ती वाचत वाचत मी जुन्या आठवणीत हरवून गेले.
शाळा काॅलेजच्या दिवसात मित्र मैत्रिणी हे आपलं दुसरं जग असतं. अभ्यास, खेळ या सोबतच आपली अनेक गुपितं माहित असलेली हक्काची व्यक्ती म्हणजे मैत्रिणी. माझ्याही खूप मैत्रिणी आहेत. त्यातील काही खूप जवळच्या. आता असंच म्हणावं लागेल की आमच्या वेळी मोबाईल मेसेज इंटरनेट हे नव्हतं त्यामुळे शुभेच्छा , मनातलं बोलायला Greeting cards, पत्रं यांचा आधार असायचा. Slam book ही तेव्हाची trending गोष्ट होती.
मी आणि माझ्या मैत्रिणी एकमेकींना खूप पत्रं लिहायचो. ती पत्र वाचताना वाटतं आज सामान्य वाटणा-या पत्रातील गोष्टी त्यावेळेस किती महत्त्वाच्या होत्या. आयुष्यभर मैत्री जपायचं ठरवून लग्नानंतर आपण संसारात रमतो आणि मैत्री विसरून जातो . ती पत्रं वाचून मी माझ्या जुन्या मैत्रिणींना नव्याने संपर्क करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. पण खरं सांगायचं तर मला तितका प्रतिसाद मिळाला नाही जितका मला अपेक्षित होता. मला वाटतं आपल्या त्यावेळच्या भावना , ती commitment , मनाची ओढ ही काळाप्रमाणे बदलते. लग्नाआधी मैत्रिणींबरोबर घालवलेल्या क्षणांना आठवणं हेसुद्धा काही जणींना आवडत नाही. बहुतेक ते सगळं म्हणजे तरूण वयातला बालिशपणा वाटत असेल. मुलांची मैत्री मात्र आयुष्यभर तशीच रहात असावी. खरंखोटं काही असलं तरी मी मैत्रिणींच्या बाबतीत हळवी आहे. मी त्या सगळ्या आठवणी मी मनापासून जपल्या आहेत आणि अजूनही मी त्यात रमते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा